शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सनसनाटी आरोप त्यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईत सावली डान्सबार असून पोलिसांनी छापा टाकून तेथून २२ बारबाला ताब्यात घेतल्याचे सांगितले. ज्या खात्याचे मंत्री असतात, त्यासंबंधी त्यांनी कोणताही उद्योग व्यापार करू नये, असे संकेत आहेत. तरीही आपल्या पदाचा वापर करून राज्यमंत्री कदम यांनी डान्सबारवरील कारवाईदरम्यान हस्तक्षेप केला, असा गंभीर आरोप परब यांनी विधान परिषदेत केला. त्यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षानेही राज्यमंत्री कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याचसंदर्भातील प्रश्न महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आला होता.
advertisement
उखाणा घ्यायला सांगितल्यासारखं नकार काय देता...
रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षांना अजूनही त्यांचं काम माहिती नाही. राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला हस्तक्षेप किंबहुना संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे, महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता? असा टोला त्यांनी चाकणकर यांना लगावला आहे.
सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाल का?
मागच्या आठवड्यात एका सर्व्हेनुसार २०२४-२०२५ या कालावधीत १८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची संख्या ४०९६ आहे आणि १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३३५९९ इतकी आहे अशी माहिती खडसे यांनी दिली. तसेच तुमचे महिला आयोग यावर काय पावले उचलत आहे? तुम्ही याबाबत काही धोरण तयार केले आहे का? असे सवाल विचारत सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाल का? असा चिमटाही त्यांनी चाकणकर यांना काढला आहे.