कर्जतपाठोपाठ जामखेडमध्येही रोहित पवार यांनी आमसभा घेतली. आमसभेच्या माध्यमातून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन, अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे निर्देश देण्याचे रोहित पवार यांचे प्रयोजन होते. मात्र रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला अरेरावीची भाषा केल्याने त्यांच्या आमसभेला गालबोट लागले.
आमसभेत नक्की काय घडले?
जामखेडमधील एका नागरिकाने ड्रेनेज गटाराच्या निकृष्ट कामावरून रोहित पवार यांच्यासमोर अधिकाऱ्याला प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी निकृष्ट कामाचे काही फोटोही दाखवले. त्यावर हे कधीचे फोटो आहेत माहिती नाही, असे मोघम उत्तर अधिकाऱ्याने दिला. त्यावर रोहित पवार चांगलेच संतापले. तक्रारकर्त्याची बाजू घेऊन रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला सुनावले.
advertisement
तक्रार करणारे लोक काय बाळवट आहेत की त्यांना वेड लागलंय? आतापर्यंत तू काय गोट्या खेळत होता का? तू आधी खिशातला हात काढ... तू खूप चांगलं काम करतोय दिसतंय आम्हाला... मिजासखोर पद्धतीने तू बोलू नको.. या लोकांनी दाखवलेले निकृष्ट काम याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. हे निकृष्ट दर्जाचेच काम झाले आहे. हा पैसा तुमच्या बापाचा नाही. सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला सुनावले.
चौफेर टीकेनंतर रोहित पवार यांचे ट्विट
सर्वच विभागाच्या कारभाराबाबत जामखेडमधील नागरिकांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या आणि तक्रार करणारी माणसं ही आवाज नसलेली सामान्य माणसं आहेत. प्रशासनाने सहानुभूतीने आणि आत्मियतेने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्या सोडवणं अपेक्षित आहे, परंतु त्याऐवजी चांगली वागणूक मिळत नसेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. काही अधिकारी नक्कीच प्रामाणिकपणे काम करतात, परंतु काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं प्रशासनाची बदनामी होतेच पण नागरिकांनाही मनस्ताप होतो. भविष्यात कोणत्याही नागरिकाला अडचण आली नाही पाहिजे आणि कामं ही वेळेवर आणि नियमात झाली पाहिजेत, असा प्रयत्न आहे. त्यामध्ये मात्र दिरंगाई झाल्यास कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याबाबत सक्त सूचना प्रशासनाला दिल्या. काही अडचणी या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत त्याचाही पाठपुरावा सुरु राहील, असे रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करून म्हटले.