खरं तर बुधवारी सकाळी अजित पवार बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला.अजित पवारांसोबत झालेल्या या विमान अपघातात आणखी चार जणांचाही मृ्त्यू झाला होता.यामध्ये एक अजित पवार यांचे विश्वासू अंगरक्षक विदीप दिलीपराव जाधव यांचा देखील समावेश होता. मागच्या 7 वर्षापासून विदीप जाधव अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.आणि बुधवारी ही सावली देखील अजित पवारांसोबत विरली.विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री सातार्यातील त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकल्याने मुखाग्नी दिला होता. त्यामुळे हे दृष्य पाहून अनेकांना भरून आलं होतं.
advertisement
दरम्यान आज सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
कोण होते विदीप जाधव?
महाराष्ट्राच्या पोलीस दलात विदीप जाधव हे 2009 मध्ये दाखल झाले होते. चोख काम करण्याची पद्धत आणि शिस्त यामुळे विदीप यांना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. न्यायाधीश जे.एन.सानप यांचे अंगरक्षक म्हणून विदीप यांनी 2010 ते 2013 या काळात काम केले.त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर 2019 पासून विदीप जाधव आज अखेर अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.
