पाथर्डीमध्ये ॲड. प्रतापकाका ढाकणे यांनी आयोजित केलेल्या आभार मेळाव्याला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि येणाऱ्या निवडणुकीत जनमताचं प्रतिबिंब निकालात उतरवायचं असेल तर अधिक जागरुक राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. शेवगाव-पाथर्डीच नाही तर एकूणच राज्यातील विधानसभेच्या निकालाबाबत मतदारांमध्ये अनेक शंका आहेत. त्यामुळं महायुतीला मिळालेला हा विजय जनतेचा कौल नाही तर ईव्हीएमच्या माध्यमातून चोरलेला निकाल असल्याची लोकभावना आहे. त्यामुळेच पाथर्डी तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची होळी केली, असे रोहित पवार यांनी सांगितले.
advertisement
प्रतापकाका ढाकणे यांच्या आभार मेळाव्याला शिवशंकर राजळे, हरिश भारदे, राणीताई लंके, नासिरभाई शेख, बंडू पाटील बोरुडे, योगिताताई राजळे, सिताराम बोरुडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका
महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारलेला आहे. जनमताचा कौल ईव्हीएमविरोधात असून त्यांनी दिलेल्या मतांचे प्रतिबंब निकालात उमटलेले नाही, असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ईव्हीएमविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ईव्हीएम लोकांना नको असेल तर सत्ताधाऱ्यांची बळजबरी कशाला, असा सवाल ते विचारत आहेत. मविआच्या अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी आयोगाकडे पैसे भरले आहेत.
अनेक मतदारसंघातले निकाल धक्कादायक असल्याची तक्रार घेवून राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांच्याकडे गेल्यानंतर पवार यांनी वकिलांची टीम फौज तयार केली आहे तर कुणीही मागे हटू नका असे सांगत ठाकरे गट आणि काँग्रेसनेही ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर बोट ठेवले आहे.
