शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून काका अजित पवार यांचा बचाव केला आहे. रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते.वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले,संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं.पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली 35-40 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे,असे रोहित पवार यांनी सांगितले.
advertisement
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही.पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हव, असे सांगत रोहित पवार यांनी पडद्यामागे कोण डाव खेळतोय,याचा खुलासा त्यांनी केला. तसेच आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू,असेही रोहित पवार यांनी शेवटी सांगितले.
वादानंतर अजित पवार यांचं स्पष्टीकरण
अजित पवार यांनी सोशल मिडिया पोस्ट शेअर करून वादावर स्पष्टीकरण दिले आहे.सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता, असे अजित पवार यांनी सांगितले.
आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे देखील अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केले.
प्रकरण काय?
31 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदा मुरूम उपसा प्रकरणावरून करमाळा डीवायएसपी असणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील फोनचे संभाषण व्हायरल झाले. त्यात अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याशी बोलताना ज्या पद्धतीने भाषा वापरली, त्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. तर, याप्रकरणी संबंधित ग्रामस्थांवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुर्डूतील 15 ते 20 ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणि बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.