वैष्णवी हगवणे संशयित मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा म्हणून आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरही विविध आरोप झाले. सुपेकर यांच्या नावावर हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांना अनेक धमकावले होते. तसेच जालिंदर सुपेकर यांच्यावर तुरुंगातून सुटण्यासाठी एका कैद्याला ५०० कोटी मागितल्याचा आरोप आहे. त्याचवेळी कारागृह साहित्य खरेदी प्रकरणा ५०० कोटींहून अधिक भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. विविध आरोपांनी अडचणीत आलेल्या सुपेकरांवर आणखी एक गंभीर आरोप झाला आहे.
advertisement
राजकीय नेत्यांना धमक्या दिल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले
जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात आंदोलन केल्याने त्यांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले. माजी आमदार अनिल गोटे, विद्या चव्हाण, नीलम गोरे, मंदा म्हात्रे यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांकडून आपल्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला, असे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता म्हणाले. धुळे, मुंबई , नवी मुंबई आणि पुण्यात विविध ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
सुपेकरांविरोधातील पुरावे आणि तक्रारी डिलीट करण्यात आल्या
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकाकडून ईमेल आयडी आणि पासवर्ड घेऊन सुपेकरांविरोधात असलेले पुरावे आणि तक्रारी डिलीट करण्यात आल्याचाही आरोप दीपक कुमार गुप्ता यांनी केला.
अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि प्रभाकर रायते यांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे खोट्या गुन्ह्यात सुपेकरांनी अडकविले. सुपेकर यांच्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांशी संबंधित जबाबदारीची पोस्टिंग देवू नये. तसेच त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी गुप्ता यांनी केली.
ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे काय म्हणाले?
जळगावचे पोलीस अधीक्षक असताना सुपेकरांचे निलंबन करावे यासाठी आम्ही आंदोलन केले. मात्र पोलिस दलातील सोन्याचा मुलामा वरपर्यंत जातो म्हणून आम्ही आंदोलन करून देखील कमी पडलो. सुपेकरांनी काही लोकांना हाताशी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अशोक सादरे यांना आत्महत्या करावी लागली त्याला जबाबदार सुपेकर आहे.
अशोक सादरे यांच्यासोबत एका अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानुसार सुपेकरांचे सोनेरी लाड केले जात होते, याचा पुरावा समोर आला होता. पुरावा असून देखील जालिंदर सुपेकर आणि प्रभाकर रायते सारखे भ्रष्ट अधिकारी सुटून जातात आणि त्याला वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतात. वैष्णवी हगवणे असो की जेलमधील भ्रष्टाचार प्रकरणात सुपेकरांचे नुसते निलंबन नव्हे तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी गजानन मालपुरे यांनी केली आहे.
