सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असं या उमेदवाराचं नाव आहे. कसलेही राजकीय पाठबळ नसताना, खिशात पैसे नसताना, स्वतःचं बँक पासबुकही नसताना, केवळ लोकवर्गणीच्या पैशांतून कराळे यांनी विजय खेचून आणला आहे. या तरुणाने प्रस्थापितांना धूळ चारत हा ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.
‘ज्याचा कोणी नाही, त्याचा जांभा’
सचिन कराळे यांची ओळख नेरमध्ये एक 'निस्वार्थी कार्यकर्ता' म्हणून आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची, घरची गरिबी पाचवीला पुजलेली आणि स्वतःचे हक्काचं घरही नाही. अशा परिस्थितीत कधी दवाखान्यात तर कधी मित्राच्या हॉटेलमध्ये मुक्काम करून जांभाने गेली अनेक वर्षे जनसेवा केली. विशेषतः रुग्णसेवेसाठी तो २४ तास उपलब्ध असतो. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णाचा तो आधारवड ठरला. याच कामाची पावती नेरच्या जनतेने त्याला दिली.
advertisement
प्रस्थापितांच्या अनुभवावर जनसेवेची मात
नेरच्या प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या जांभासमोर साधेसुधे आव्हान नव्हते. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सुभाष भोयर हे त्यांच्या विरोधात होते. भोयर हे १५ वर्षे नगरसेवक राहिलेले आणि राजकारणातील मोठा अनुभव असलेले मातब्बर नेते होते. मात्र, जांभासाठी नेरच्या सामान्य जनतेने स्वतःहून लोकवर्गणी गोळा केली. मित्रांनी त्याला निवडणूक लढवण्यासाठी कपडे शिवून दिले. 'निवडणूक ही धनाने नाही तर जनतेच्या मनाने लढली जाते’, हे जांभाच्या विजयानं सिद्ध केले.
