सांगली : भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावरून सदाभाऊ खोत यांना सुनावलं. आता या प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
advertisement
माझी गावगाड्याची भाषा आहे. काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. गावगाड्याची भाषा असते. एखादा आभाळाकडं बघत असला तर आम्ही म्हणतो आरशात जाऊन बघ. गावगाड्याची भाषा समजायला मातीत रुजावं लागतं. मातीत राबावं लागतं आणि मातीतच मरावं लागतं. तेव्हाच गावाकडेची आणि मातीची भाषा समजते अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करताना दिली.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचाय असं जाहीर सभांमधून सांगतोय. तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचाय का अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. शरद पवार यांच्या आजारावर केलेल्या या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
अजितदादांनी दिली तंबी
शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप नेते सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. टीका करताना नेहमीप्रमाणे त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी तंबीच अजित पवार यांनी दिली होती.