सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला.
तासगाव येथील एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला. तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला. यानंतर आमदार रोहित पाटील हे तातडीने संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले.
advertisement
बूथवर आमदार रोहित पाटील आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट वेगवेगळे केले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
