महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम सलोख्याच्या भावनेने विविध सण-उत्सव साजरे करतात. गणेशोत्सव देखील असाच एक हिंदू धर्मियांचा उत्सव आहे. पण, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणाऱ्या दोन गावांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा आदर्श जपला आहे. ही गावे म्हणजे गोटखिंडी आणि येलूर होय.
advertisement
गोटखिंडीची अनोखी परंपरा
महाराष्ट्रातील इतर खेड्यांप्रमाणेच वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहतात. 1980 मध्ये येथील झुंजार चौकात गणेशोत्सव साजरा होत होता. त्यावर्षी सर्वत्र मोठा पाऊस होता. पाऊस इतका वाढला की गणपतीसाठी तयार केलेला निवारा पावसाने खराब झाला. बाप्पाची मूर्ती पावसाने भिजणार होती पाऊस काही उघडीपीच नाव घेत नव्हता. तेव्हा गावातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आले आणि सर्वानुमते निवाऱ्यासाठी गणपती मशिदीत बसवण्याचा निर्णय झाला. नैसर्गिक संकटाला हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे तोंड देत गणेश उत्सवाचा सांस्कृतिक ठेवा जपला. त्या घटनेमुळे सन 1980 पासूनचा गणेश उत्सव नेहमीच ‘मशिदीतील गणपती’ म्हणून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा ठरला.
मधल्या काळात धार्मिक द्वेषाने राज्यामध्ये कित्येकदा दंगली उसळल्या. मिरजेसारख्या ठिकाणी अनेकदा दंगे झाले. अलीकडच्या काळात ही वरचेवर बंधुता सामाजिक सलोखा याला तिलांजली देणाऱ्या घटना घडतात. परंतु गोटखिंडीकरांनी या सामाजिक द्वेषाला, जातीय अन् धार्मिक भेदभाव करणाऱ्या विषाला कधीच थारा दिला नाही. गेल्या 45 वर्षांपासून तितक्याच उत्साहाने, एकोप्याने ही परंपरा गोटखिंडीतील दोन्ही धर्मीय बांधवांनी जोपासली.
येलूर गावचे रिक्षा चालक
वाळवा तालुक्यातील येलूर गावातील रिक्षाचालक शफी मुलाणी यांनी देखील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. येलूर गावापासून गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना दीड किलोमीटर दूर आहे. शिवाय गावात जाण्यासाठी दळणवळणाची साधनेही कमी आहेत. यामुळे गणेश भक्तांची गैरसोय होते. ही गैरसोय लक्षात घेऊन रिक्षा व्यावसायिक शफी मुलाणी यांनी एक उपक्रम राबविला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी शफी मुलाणी हे मोफत रिक्षा सवारी करून घरोघरी बाप्पाच्या मूर्ती पोहोच करतात. मागील 10 वर्षांपासून हा भक्तीभाव त्यांनी जपला आहे.
धर्म आडवा येत नाही...
“आमच्या गावात हिंदू-मुस्लिम संघर्ष असं कधीच घडलं नाही. लोकांची गैरसोय लक्षात घेऊन मी सेवा करायला सुरुवात केली. तेव्हापासून आज दहा वर्ष लोक मला भरभरून प्रेम देतात. माझ्या गाडीतून गणपती नेण्यासाठी लोक वाट पाहतात, फोनवर फोन करतात. "भैय्या आमचा गणपती सुद्धा तुमच्या गाडीतून घरी न्यायचा असल्याचे सांगतात". याशिवाय गावातील सार्वजनिक मंडळे आम्हाला आरतीसाठी निमंत्रित करतात. मी माझ्या घरी देखील गणपती बाप्पाची पूजा करतो. गेल्या वीस वर्षांपासून संकष्टीचा उपवास देखील करतो. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. मनाच्या शांतीसाठी श्रद्धेने गणपतीची उपासना करण्यात मला माझा धर्म आठवण्याची गरज कधीच वाटली नाही, असं मुलाणी सांगतात.
दोन्ही धर्माबद्दल तितकीच श्रद्धा
“माझ्या मनात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मांबद्दल तितकीच श्रद्धा आहे. गुण्या गोविंदाने राहण्याची आपली संस्कृती आहे. माझा रिक्षातून गणपती नेत गावकरी माझ्याकडून बाप्पाची सेवा करून घेतात याचा मला फार आनंद आहे. आपल्या श्रद्धेने देवाची सेवा करण्यात भीती वाटण्याचं कारण नाही. मी मुस्लिम म्हणून जन्माला आलो पण गणपतीची भक्ती करण्यात मला समाधान वाटते, तर ती मी करतो. मला कुणीही अडवण्याचा, नाकारण्याचा, द्वेषाचा अनुभव कधीच आला नाही. असा अनुभव सांगत येलूरचे रिक्षा चालक शफी मुलाणी एकोप्याने राहण्याचीच आपली परंपरा असल्याने भीती वाटण्याचं कारण नाही,” असे सांगतात.