जुना सातारा जिल्हा आणि सध्याचा सांगली जिल्हा स्वातंत्र्यलढ्यामध्ये हिरिरीने सहभागी होता. त्याकाळी खेडो-पाडी सेवा दलाच्या सभा भरत होत्या. या सेवा दलाच्या सभांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत अनेकजण सहभागी होत असल्याचा अनुभव सांगली जिल्ह्यातील कुंडल गावच्या सरस्वती लुपणे यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितला.
advertisement
सरस्वती आजी सांगतात, "मी नऊ-दहा वर्षांची होते. तेव्हा माझ्या माहेरी पलूस येथे (जि.सांगली) मोकळ्या मैदानात सेवा दलाची सभा असायची. आम्ही सगळेजण सभेला जात होतो. तिथल्या प्रार्थना, देशभक्तीपर गीते, ओव्या, पाळणे आम्हालाही तोंडपाठ व्हायचे. स्वातंत्र्याच्या भावनेने बहरलेला तो काळ होता. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार असायचा तो म्हणजे देशाचे स्वातंत्र्य."
देशभक्तीची भावना खोलवर रुजलेल्या सरस्वती आजींचं आजचं वय 92 वर्षे आहे. मात्र आजही त्यांना देश स्वातंत्र्याची भावना प्रेरित करणारा पाळणा जसाच्या तसा स्मरणात आहे. सेवा दलातील आठवणी सांगता सांगता सरस्वती आजींनी स्वातंत्र्यलढ्यावरील पाळणा म्हणून दाखवला.
स्वातंत्र्य लढ्यातील पाळणा
पहिले नमन माझे हिंद मातेला
दुसरे नमन माझे राष्ट्र देशाला
तिसरे नमन माझे गांधीबाबाला
मातेच्या पोटी हिरा जन्मला
जो बाळा जो जो रे जो...
पहिल्या दिवशी पहिला प्रकार
रामगाड्याचा केलाय चुर
इंग्रज सरकार केलया चूर
बंदोबस्ताला गोरा लष्कर
जो बाळा जो
तिसऱ्या दिवशी तिसरा डाव
राम मनोहर लोहिया डॉक्टर
रेडिओवरून बोलतो सारं
जो बाळा जो
पाचव्या दिवशी पाचवा येई
अरुणादेवी धावून जाई
साऱ्या देशाला संदेश देई
क्रांती देवीची पूजा करावी
जो बाळा जो
सहाव्या दिवशी सहावा फेरा
फुलं पाडून तोडिल्या तारा
आगगाडी तुम्ही बंदच करा
दिसल गोरा तिथेच धरा
जो बाळा जो
सातव्या दिवशी सातवा धडा
कोर्ट कचेरीवर मोरचा काढा
पोस्ट ऑफिस बंदचं पाढा
नोकरशाहींनो नोकऱ्या सोडा
जो बाळा जो
आठव्या दिवशी अवतार आठवा
नाना पाटलाला लवकर भेटवा
गुंड लोकांना माघारी हटवा
जो बाळा जो
नवव्या दिवशी नवरत्न हार
नाना पाटील क्रांतीचा वीर
भूमिगत संगे घेऊन चाले
स्थापन केले पत्री सरकार
जो बाळा जो
दहाव्या दिवशी दहावा गुणं
साने गुरुजी माते प्रमाणं
क्रांती देवीचे केले पालन
राष्ट्रसेवादल क्रांतीचे पान
जो बाळा जो
अकराव्या दिवशी आकार झाला
सुभाष बाबूंनी मंत्र दिला
आझाद सैनिकांनो जय हिंद बोला
एकजुटीने चला दिंडीला
जो बाळा जो
बाराव्या दिवशी बारावा रंग
लहान थोर झाले क्रांतीत दंग
साऱ्या देशात वाजले शिंग
इंग्रजाचे राज्य केले दुभंग
जो बाळा जो
राष्ट्र पाळणे इथून घोका
काणीमंत्र बाळाचा "जयहिंद" फुका
तुकारामाची विनंती ऐका
जो बाळा जो
अशा पाळणा गीतातून स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याची आठवण सरस्वती आजी सांगतात. या लोकगीतांमुळे स्वातंत्र्याची भावना आणि देश प्रेमाचा प्रसार झाला.