क्रांतिकारकांच्या स्मृतींचा आदर करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी स्मारके आणि पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी गावात थोर हुतात्म्यांच्या स्मृती झाडांच्या रूपात अनोख्या आणि आदर्श पध्दतीने जपल्या आहेत. या ठिकाणाला ‘क्रांती स्मृतीवन’ म्हणून ओळखले जाते.
advertisement
क्रांती स्मृतीवन निर्मितीचा उद्देश
"स्वातंत्र्यलढ्यातील थोरवीरांनी दिलेल्या प्रेरणेचा आदर करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी" हा क्रांती स्मृतीवन निर्मितीमागील मुख्य उद्देश असल्याचे बलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार सांगतात. त्यांनी येरळा नदीकाठावरील स्वतःच्या पाच एकर जागेत वीस वर्षांपूर्वी स्मृतीवन उभारले आहे. क्रांती स्मृतीवन या नावामागील इतिहास आणि उद्देश जाणून घेण्यासाठी लोकल18 ने भाई संपतराव पवार यांच्याशी क्रांतीवनी संवाद साधला.
क्रांतीस्मृती वनाचे निर्माते भाई संपतराव पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सन 1942 मध्ये महात्मा गांधींनी 'करेंगे या मरेंगे' अशी घोषणा दिली आणि तिथूनच स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी पर्व सुरू झाले. या सुवर्ण पर्वाचा सुवर्ण महोत्सव 1992 साली साजरा करण्यात आला. मात्र, सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला इस्लामपूर, शिराळा, आणि कागलमध्ये एकतर्फी प्रेमातून घडलेल्या हत्यांच्या घटनांनी तरुण पिढीची चिंता वाढवली. वाळवा हे 1942 च्या चळवळीचे प्रमुख केंद्र होते, तेव्हा येथील तरुण स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे होते. या पार्श्वभूमीवर तरुणांना देशासाठी प्रेरणा देण्यासाठी ‘क्रांती स्मृतीवन महाराष्ट्र व्यासपीठ’ तयार करण्यात आले. क्रांतिकारकांच्या नावाने एक-एक वृक्ष लावून त्यांची स्मृती जागवली जाते."
क्रांती स्मृतीवनाचा अनोखा उपक्रम
स्मृतीवनाच्या सुरुवातीला थोर मातांच्या स्मृती वृक्षांचे 'विसावा केंद्र' आहे. इथे थोरवीरांच्या स्मृती जपल्या जातात. याठिकाणी व्हिजन सेंटर, स्मृती खांब, विचारमंच, आणि स्मृती पॅगोडा यांची स्थापना करण्यात आली आहे. क्रांती स्मृतीवनात प्रत्येक हुतात्म्याच्या नावाने एक झाड लावण्यात आले असून त्यास "क्यूआर कोड" दिला आहे. या कोडद्वारे थोरवीरांची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजीत मिळते. या उपक्रमात ‘वन, मन आणि पर्यावरण’ या त्रिसूत्रीच्या आधारावर युवकांसाठी प्रबोधन केंद्र उभारले जात आहे.
स्मृतीवनाची पुढील वाटचाल
स्थानिक पत्रकार दीपक पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “क्रांतीवनात सध्या इन्स्पिरेशन सेंटर उभारले जात आहे. बदलता भारत युवा पिढीला समजण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून हे स्मृतीवन आकारास आले आहे. प्रत्येक झाडासोबत एक फुलवेल लावण्यात आली असून ती बहरल्यावर नैसर्गिकपणे क्रांतिकारकांच्या स्मृतींना फुले वाहिली जतील अशी रचना करण्यात आली आहे.”
कुठं आहे स्मृती क्रांतीवन?
सांगलीपासून 45 किलोमीटर आणि विटा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रांती स्मृतीवनला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भेट देणे, ही निश्चितच देशभक्तीची प्रेरणादायी अनुभूती ठरेल.