नेमकं प्रकरण काय आहे?
सांगलीतील शिवशंभो चौकातील एका बंगल्यात घरगुती कार्यक्रम सुरू होता. दुपारच्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एकजण इथे कार्याक्रमासाठी आला होता. यावेळी त्याने कोल्हापूरवरून एक मगरीचं पिल्लू प्लास्टिकच्या डब्ब्यात पकडून आणलं होतं. ही बाब प्राणीमित्र कौस्तुभ पोळ निर्दशानास आली. पोळ यांनी वन्यजीवाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत तातडीने याची माहिती सांगलीच्या वनविभागास कळवली. यानंतर कार्यक्रमस्थळी बराच गोंधळ बघायला मिळाला.
advertisement
कौस्तुभ पोळ हे प्राणीमित्र आहेत. ते शहरात जखमी प्राण्यांचे रेस्क्यू करण्याचे काम करतात. ते एका कामानिमित्त कर्नाळवरून सांगलीत येत होते. त्यावेळी शिवशंभो चौकातील एका घरात कार्यक्रम होता. त्याठिकाणी एक व्यक्ती बाटलीतून मगरीचे पिल्लू घेवून जात असल्याचे पोळ यांना दिसून आला. त्यांनी तातडीने माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांना कळवले. ते आणि प्राणीमित्र घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शेतातून मगरीचे पिल्लू रेस्क्यू केल्याची माहिती त्यांना मिळाली.
संबंधित व्यक्तीनं मगरीचं पिल्लू वनविभागाच्या ताब्यात न देता स्वतःकडे बाळगून थेट सांगलीत आणलं. तो मगरीचे पिल्लू लोकांसमोर दाखवत होता. यावर प्राणीमित्रांनी आक्षेप घेतला आणि मगरीच्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली. पण संबंधित तरुण मगरीच्या पिल्लाला सोडण्यास तयार नव्हता. यावरून कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ झाला. भररस्त्यात सुरू असलेल्या या वादाची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही प्राणीमित्रांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली. त्यावेळी मगर मिळून आली नाही. तोपर्यंत संबंधित व्यक्तीने ती मगर कोल्हापूर वनविभागाच्या ताब्यात दिल्याचं सांगितलं. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर मगरीच्या पिल्लावरून सुरू असलेला वाद मिटला.
