चोरीचा मार्ग निवडला
प्रेयसीच्या वाढदिवसाला महागडी भेटवस्तू देण्याच्या इच्छेने एका तरुणाने थेट जबरी चोरीचा मार्ग निवडला. या धक्कादायक घटनेमुळे तो आणि त्याचा मित्र दोघंही गजाआड झाले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना सांगलीतील असून, आरोपींचे नाव पार्श्व अनिल माणगावकर आणि हृषीकेश मोहन पाटणे आहे.
advertisement
मित्राला मदतीला घेतलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पार्श्वला त्याच्या प्रेयसीच्या वाढदिवसासाठी पैसे हवे होते. भेटवस्तू महागडी असल्यामुळे त्याने चोरीचा प्लॅन आखला. त्याने त्याचा मित्र हृषीकेश याला मदतीला घेतले आणि हरिपूर गावातील एका घरात चोरी करण्याचे ठरवले. या घरात 70 वर्षीय वनिता रामचंद्र रहाटे या एकट्याच राहत होत्या.
1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरला
आरोपी पार्श्वने पाणी पिण्याचा बहाणा करून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि कर्णफुले असा 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरला. या घटनेनंतर वृद्ध महिलेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना पकडले. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. दरम्यान, प्रेयसीला खुश करण्यासाठी केलेल्या या कृत्यामुळे तो आता तुरुंगात पोहोचला आहे.