प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय 54) यांनी शेतामध्येच जीवनयात्रा संपवली. प्रगतशील शेतकरी म्हणून गावामध्ये ओळख असलेल्या प्रतापराव यांच्याकडे तीन एकर द्राक्ष बाग होती. दिवस -रात्र मेहनत करून त्यांनी ही बाग उभी केली होती. आधुनिक पद्धतीचा अवलंब, योग्य व्यवस्थापन, वेळोवेळी राखलेली निगा या सगळ्यामुळे त्यांना गावात आदर्श मानले जात होते. याच द्राक्ष बागेने यापूर्वी त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न दिले होते. यावरच त्यांनी कुटुंबाचा मुलांचा सांभाळ आणि मुलांचे शिक्षण केले. नव्या स्वप्नांसाठी सगळ्यांची धडपड सुरू असतानाच निसर्गाने त्यांची साथ सोडली.
advertisement
गेल्या काही वर्षांपासून सततच्या हवामान बदलाने कधी अवकाळी पाऊस, कधी द्राक्षबागेवर रोगराई, तर कधी अनियमित तापमान या सगळ्याने त्यांच्या बागेवर मोठा परिणाम केला. अशातच मागील पाच वर्षांपासून द्राक्षशेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये भयंकर वाढ झाली. परिणामी शेतीखर्चामध्ये मोठा भुर्दंड बसू लागला. त्यामुळे विकास सोसायटी व बँकेकडून काढलेल्या कर्जाचा बोजा वाढला. अशातच मागील दोन वर्षांत झालेल्या सततच्या ढगाळ वातावरणाने आणि अतिपावसाने त्यांची द्राक्षबाग फुलली नाही. अत्यंत जिकिरीने खते आणि औषधांचा खर्च करून देखील द्राक्षबागेस फलधारणा झाली नाही. हंगामामागून हंगाम वाया गेले अन् पदरी केवळ निराशा उरली. यातून कर्जाचे डोंगर वाढत गेल्याने आर्थिक विवंचनेतून प्रतापराव शिंदे यांनी जीवन संपवले.
मुलांना अधिकारी झालेले पाहायचं होतं
प्रतापराव शिंदे यांचा मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. तर मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्या भविष्यासाठी प्रतापरावांनी अनेक स्वप्न पाहिली होती. पोरांना अधिकारी झालेले पाहायचं होतं. पण हे स्वप्न भंगले. पत्नी अन् मुलांची त्यांची साथ सुटली.
जुने फेडण्यासाठी नवे कर्ज
सोसायटी व अन्य जुने कर्ज फेडण्यासाठी प्रतापरावांनी एका बँकेतून कर्ज घेतले. बँकेच्या हप्त्याचा ताण वाढला. कर्जाचा आकडा 25-30 लाखाच्या घरात पोहचला अन् आर्थिक गणित बिघडले. मध्यम मुदतीच्या कर्जाने ते अधिक आर्थिक विवंचनेत सापडले. गावकरी त्यांना धीर देत होते; मात्र उत्पन्नाचे पारडे खाली अन् खर्च, कर्जाचे पारडे वरच राहिल्याने त्यांची मानसिकता खचली आणि त्यांनी जीवन संपवले.
अत्यंत मेहनती शेतकऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने शेतीपुढील समस्या, हवामान बदलाची तीव्रता, खते-औषधांच्या अनियंत्रित किंमती असे कितीतरी प्रश्न ऐरणीवर येत आहेत. जगाचा पोशिंदा असणाऱ्या कृषीप्रधान देशातील अन् प्रगत राज्यातील शेतकऱ्यांच्या अशा हतबलतेस जबाबदार कोण? असे प्रश्न कायम निरुत्तरच आहेत.






