हिंदीविरोधातील मोर्चा जरी रद्द झाला असला तरी मराठीजनांच्या दबावाचा हा विजय असल्याचे सांगत जल्लोष करण्यासाठी ५ तारखेला सभा आयोजित करण्यात आली आहे. विजय मेळाव्यासाठी मुंबईतल्या वरळी येथील एनएससीआय डोममध्ये सभा घेण्याचे दोन्ही पक्षांचे ठरले असून सकाळच्या वेळेत ही सभा संपन्न होणार असल्याचे कळते आहे.
संजय राऊत यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर यांची गुप्त भेट
advertisement
मुंबईतील जल्लोष मोर्चाचे नियोजन करण्याकरिता ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांच्या गुप्त बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. संदीप देशपांडे आणि आमदार सरदेसाई यांच्यातील भेटीनंतर आता संजय राऊत यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर आणि अभिजीत पानसे यांची तासाभरापूर्वी गुप्त बैठक पार पडली. चाळीस मिनिटे झालेल्या या गुप्त बैठकीमध्ये ५ जुलैच्या जल्लोष सभेच्या नियोजनाची रणनीती ठरली.
विजयी मेळाव्यासाठी वरळीतील एनएससीआय डोम या ठिकाणावर दोन्ही राजकीय पक्षांचे एकमत झाले. कोणताही राजकीय अजेंडा नाही, कोणताही राजकीय झेंडा नाही, केवळ मराठीचा मुद्द्यावर विजयी जल्लोष मेळावा साजरा करण्यावर दोन्ही पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
उद्धव-राज ठाकरे १८ वर्षांनंतर एकाच मंचावर येणार
मराठी माणसांच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायला तयार असल्याचे थेटपणे संकेत दिले. गेली महिना दोन महिने ठाकरे बंधुंच्या युतीच्या केवळ चर्चा होत असताना त्यासाठीचे पाऊल थेटपणे उचलले जात नव्हते. अखेर हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेनेचे सूर जुळाले असून ५ तारखेच्या जल्लोष सभेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल १८ वर्षांनंतर एकाच मंचावर येणार आहेत.