जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बुधवारी अजित पवार बारामतीला जात होते. धावपट्टी केवळ ५०० मीटर अंतरावर असताना त्यांच्या विमानाला अपघात होऊन, यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगत भारतीय जनता पक्षाने गुरूवारी त्यांना आदरांजली वाहणाऱ्या जाहिराती विविध वर्तमानपत्रांत दिल्या. ज्या भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असे म्हणत हिणवले, त्याच अजित पवार यांच्या जाण्यानंतर सहानुभूतीसाठी भाजपने जाहिराती दिल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत राऊत यांनी भाजपच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
advertisement
काय म्हणाले संजय राऊत?
भाजपने कमाल केली! अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजितदादांवर भाजप म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे संजय राऊत म्हणाले.
अजितदादांच्या मागे सिंचन घोटाळ्याचा आरोप कायमचा चिकटला
जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला, त्यांची जागा तुरुंगात असेल, असा आक्रमक प्रचार भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक २०१४ साली केला. आघाडी सरकारवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात रान उठवले. लोकांनीही भाजपच्या प्रचाराला साथ देऊन आघाडीचे सरकार घालवले. राज्यात भाजपचे सरकार आले. दरम्यानच्या काळात अजित पवार यांच्यावर सातत्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार झाला. २०१९ ला आकडे जुळत नसतानाही शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मोट बांधून राष्ट्रवादीला सत्तेत बसवले. परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून बंड केल्यानंतर आघाडीचे सरकार गेले. काही महिने विरोधी पक्षात काम केल्यानंतर अजित पवारही सत्तेच्या वळचणीला गेले. तेव्हाही अधून मधून त्यांच्यावर कधी खासगीत तर कधी उघड भाजपचे नेते बोलत राहिले. अगदी महापालिका निवडणुकीत भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरून आरोप केले. यावर बोलताना अजित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच सत्तेत बसलोय की नाही... असे म्हणत त्यांनी भाजपलाच खिंडीत गाठले. याचाच अर्थ अखेरच्या दिवसांपर्यंत सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनी अजित पवार यांची पाठ सोडली नाही.
