समाजसेवेच्या माध्यमातून गावाचा गाडा हाकणारे सरपंच संतोष देशमुख यांची गतसाली ९ डिसेंबर रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. त्यांना मारताना मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा पार केली. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली, अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्यासह अन्य सात आरोपींना अटक करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाले तरीही अजूनही आरोप निश्चित करण्यात आलेली आहे. आज मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
advertisement
कायदा सगळ्यांना समान आहे, असे म्हणतात, मग आमच्याच वेळी काय झालंय? संतोष अण्णांच्या आईचा सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगला येऊन धनंजय देशमुख यांची भेट घेतली. संतोष अण्णांच्या मातोश्री आणि पत्नीने देखील जरांगे पाटलांजवळ मन मोकळं केलं. पोलीस सगळ्याचा शोध घेतात, असे मी ऐकले आहे. कायदा सगळ्यांना समान आहे, असे म्हणतात. मग आमच्याच वेळी काय झालंय? आम्हालाच न्याय का नाही? असा आर्त सवाल करून संतोष देशमुख यांच्या मातोश्रीने हंबरडा फोडला.
माझ्या आयुष्यात ती १५ मिनिटे कधी येणार?
लातूरवरून निघाल्यावर माझा आणि त्यांचा फोन झाला. १५ मिनिटात पोहोचतो, असा त्यांचा मला फोन आला. माझ्या आयुष्यात ती १५ मिनिटे कधी येणार? लेकरांना घेऊन फक्त रडते, मी काय करू? असे म्हणत संतोष देशमुख यांच्या पत्नीने दु:ख व्यक्त केले.
कृष्णा आंधळेला बेड्या ठोकण्यात सरकारला अद्याप यश नाही
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचे आक्रमक मोर्चे निघाले. देशमुख यांना न्याय देण्यासाठी मराठवाड्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला. देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्रातही मोठ्या संख्येनेमोर्चे निघाले. दहावीची परीक्षा तोंडावर असूनही सरपंचांची लेक वैभवी देशमुख हिनेही देखील मोर्चांमध्ये सहभागी होऊन वडिलांच्या न्यायासाठी सरकारपुढे पदर पसरला. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्याला बेड्या ठोकण्यात अद्याप यश आलेले नाही.
