स्मशानभूमीच्या फाईलवर शेवटची सही
आपल्या भाषणात सरोज अहिरे यांनी एका अत्यंत प्रसंगाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "माझ्या मतदारसंघातील स्मशानभूमीच्या कामासाठी मी पाठपुरावा करत होते. दादांनी शेवटची सही माझ्या मतदारसंघातील त्याच स्मशानभूमीच्या १ कोटी रुपयांच्या निधीच्या फाईलवर केली. त्यानंतर ही मोठी दुर्दैवी घटना घडली. हा कसला संकेत म्हणायचा. माझ्या लोकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणाऱ्या दादांचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही."
advertisement
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, सध्या "आभाळ कोसळले आहे" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमकं काय सुरू आहे हे कळायला मार्ग नाही. वरिष्ठ पातळीवर काय सुरू आहे, याची मला पूर्ण कल्पना नाही. मात्र, पक्षाचा आदेश मानून मी आता मुंबईला रवाना होत आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार सरोज अहिरे भाषणात म्हणाल्या की, दादा गेले हे मन मानायला तयार नाही. ते आवाज देतील असे वाटते. आपल्याला मुंबईत बोलावतील, असे वाटते. माझ्यासारख्या सामान्य मुलीला त्यांनी आमदार केले. माझे वडील गेले त्यावेळी मी लहान होते. बाप वारले हे कळतही नव्हते. पण आता माझा दादा गेला. माझे आयुष्य घेतले असते तरीही चालले असते. पण, माझा दादा, शेतकऱ्यांचा नेता पाहिजे होता. त्यांनी घाणेरडे राजकारण कधीही केले नाही, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
सरोज अहिरे पुढे म्हणाल्या की, अजित दादांनी माझ्या मतदारसंघातील सय्यद पिंपरीच्या स्मशानभूमीच्या कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर करत त्या फाईलवर शेवटची सही केली आणि दादा गेले. हे कसे विसरु? अश्रू कसे थांबतील? पक्षाचा आदेश आला आहे, त्यामुळे मला मुंबईला जावे लागत आहे, आम्ही सर्व आमदार पवार कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहू. माझा खूप मोठा आधार हरपला आहे. काम करत आलोय, काम करत राहू, ही दादांची शिकवण आहे. त्यानुसार काम करणार आहोत. दादा पुन्हा येतील, आमचे वाईट स्वप्न निघून जाईल असे वाटते. देवा जिथे कुठे असशील तर दादाला पुन्हा आण. माझे रक्ताचे नाते नव्हते. पण, त्यांनी मला खूप प्रेम दिले. शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली. मी आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी मन हेलावून टाकणारी व्यथा सरोज अहिरे यांनी मांडली आहे.
