पोलीस उपनिरीक्षक बदने याने पीडित डॉक्टरवर अत्याचार केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. महिलेच्या हातावरील लिहिलेल्या संदेशाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी फलटणमधून अटक केली आहे. गोपाळ बदने अजूनही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. या सगळ्यावर साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूसकर यांनी त्यांचे मत मांडले आहे.
advertisement
... तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता
जर त्या महिला डॉक्टरच्या तक्रारीवर वेळीच कारवाई झाली असती किंवा तिने स्वतः तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल कोणाला सांगितले असते तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता. एक महिला पोलिस अधिकारी म्हणून, मला या घटनेबद्दल खूप वाईट आणि वेदनादायक वाटले, असे वैशाली कडूसकर म्हणाल्या.
आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन संवादाची कमी आहे का? असे विचारले असता, असे म्हणता येणार नाही. आरोपी पोलीस आहे म्हणून चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण समाजात अनेक प्रवृत्ती वावरत असतात. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा संवाद चांगला असतो. आरोपीला न्याय प्रक्रियेमध्ये घेऊन जाणे हे पोलिसांचे काम आहे. पीडितांना न्याय मिळवून देणे, हे पोलीस आणि डॉक्टरांचे कामच आहे. दोघेही एकमेकांच्या सहयोगाने काम करीत असतात, असे वैशाली कडूसकर म्हणाल्या.
पीडित पोलिसांना सांगू शकत नसतील तर तुम्ही पोलिसांना कळवा
पोलिसांनी अधिक जबाबदारीने काम करायला पाहिजे. आपण लोकांच्या सुरक्षितेसाठी काम करतो. आपल्यावर जबाबदारी अधिक असते, हे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक प्रसंग येतात पण वाईट प्रसंगांपासून सावध राहिले पाहिजे. समाजात अशा गोष्टी निदर्शनास येत असतील आणि पीडित पोलिसांना सांगू शकत नसतील तर तुम्ही त्या पोलिसांना कळवा, असे आवाहन त्यांनी केले.
आमची लेक आत्महत्या करण्यासारखी नव्हती
सुसाईड नोटमध्ये असलेल्या सर्व आरोपीवर कठोर कारवाई करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. आम्ही फलटणमध्ये पोहोचण्याअगोदरच मृतदेह खाली घेतला होता.
आमची मुलगी आत्महत्या करण्यासारखी मुलगी नव्हती, असे कुटुंबियांनी सांगितले.
