सातारा: साताऱ्यातील कराड तालुक्यात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे. नांदलापूर गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तिघा हल्लेखोरांनी सिनेस्टाईल हल्ला करून एकाचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जखिणवाडी येथील प्रवीण बोडरे (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास प्रवीण बोडरे आपल्या दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या तिघांनी त्याच्या गाडीला धडक दिली. धडक बसताच बोडरे यांनी आपली दुचाकी सोडून जीव वाचवण्यासाठी मुख्य रस्त्यावरून एका बोळात पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत बोळाच्या दोन्ही बाजूंनी त्याला घेरले आणि कोयत्याने सपासप वार करून ठार मारले. हल्ल्याची संपूर्ण पद्धत सिनेस्टाईल असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
advertisement
पंचनामा करून मृतदेह ताब्यात
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला आहे.
पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर
प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्वीच्या भांडणातून उफाळला असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी नेमका कोणत्या कारणावरून हा कट रचला, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी कराड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
साताऱ्यात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास गतीने करून दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
