फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहित आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता. या घटनेनंतर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला पीएसआय बदने अखेर शनिवारी उशिरा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र हे सरेंडर अचानक नव्हते. पोलिसांचा “एक निरोप” आणि कुटुंबावर आलेला दबाव यामुळेच बदने यांनी अखेर आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्याची इनसाइड माहिती समोर येत आहे.
advertisement
>> सरेंडरपूर्व बदनेची पळापळ
पीएसआय बदने हा शुक्रवारी पंढरपूरहून सोलापूरला गेला. तेथून ते थेट बीडच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली. या काळात बदने याने आपला ठावठिकाणा लागू नये यासाठीची काळजी घेतली होती. मात्र, पोलीस दलातील काही जणांच्या संपर्कात तो सोशल मीडियाच्या माध्यमातून होता, अशी माहिती समोर आली आहे.
>> कुटुंबाकडे एक निरोप अन्...
महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात थेट पीएसआयचे नाव आल्याने पोलीस दलावर तपासासाठी आणि आरोपीच्या अटकेसाठीचा दबाव वाढला होता. पोलिसांनी बदने याच्यापर्यंत आपला निरोप पोहचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यांच्यामार्फत निरोप पोहचवला. बदने याने आता शरणागती न पत्करल्यास त्याच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. बदने हजर झाला नाही तर त्याच्यावर निलंबनाच्या ऐवजी थेट बडतर्फीची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला.
>> बदने सरेंडर कसा झाला?
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात थेट जाण्याऐवजी पीएसआय बदने यांनी प्रथम एका स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला. त्याच्या माध्यमातून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रवेश केला. यावेळी कोणताही विरोध न करता त्यांनी स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले.
>> तपासात पहिली कबुली
प्राथमिक चौकशीत बदने यांनी सांगितले की, “मी कोणताही बलात्कार केलेला नाही.” मात्र, संबंधित महिला डॉक्टरसोबतच्या संबंधांबाबत त्यांनी मौन पत्करले असून, तपासात पुढील माहिती मिळू शकते, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
>> पुढची कायदेशीर प्रक्रिया
आज रविवारी बदने याला सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर आहेत. हा दौरा पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.
