सातारा : जिल्ह्याला अत्यंत सुरेख अशी नैसर्गिक साधनसंपत्ती लाभली आहे. इथल्या कास पठारावर तर पर्यटकांना जणू स्वर्गसुख अनुभवायला मिळतं असं म्हणतात. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक साताऱ्यात दाखल होतात. याठिकाणी दुर्मीळ अशा विविध प्रजातींच्या फुलांचा अतिशय सुरेख बहर असतो.
कास पठारावर जूनच्या पहिल्या पावसापासूनच फुलं उमलायला सुरूवात झाली. जगात न पाहायला मिळणाऱ्या फुलांचं दर्शन इथं घडतं, त्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआप या ठिकाणाकडे वळतात. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पठार पूर्णपणे रंगीबेरंगी फुलांनी फुलून जातं. एक फूल असं आहे जे दरवर्षी नाही, तर तब्बल 9 वर्षांमधून एकदाच उमलतं. हे फूल पाहण्याचं नयनरम्य सुख पर्यटकांना यंदा मिळणार आहे. 'टोपली कार्वी' असं या दुर्मीळ फुलाचं नाव.
advertisement
निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर यंदा दुर्मीळ प्रजातींची फुलं फुलण्यास सुरूवात झालीये. अजून हंगाम सुरू झाला नसला तरी फुलांना बहर येण्यास सुरूवात झाली आहे. जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर मिळालेली काहीशी उघडीप, यामुळे आता इथं धुक्याची चादर पसरली असून त्यात फुलांचा बहर पाहायला मिळतोय.
यूनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत 2012 साली कास पठाराचा समावेश करण्यात आला. अनेक लहान-मोठी रंगीबेरंगी फुलं कास पठाराच्या सौंदर्यात भर घालतात. त्यात यंदा 9 वर्षांनी उमलणाऱ्या टोपली कार्वी फुलाची भर पडलीये. तसंच गेंद, भुई, कारवी, वायतुरा, कोकंणांसीस, विघ्नहर्ता ही फुलं सध्या पाहायला मिळत आहे, आता येत्या काळात पठारावर सर्वत्र फुलंच फुलं दिसतील.