गेल्या दोन दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे रविवारी (28 सप्टेंबर) सध्याकाळी कल्याण खाडीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाणी वाढल्याने खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. या परिसरात 20 ते 25 तबेले देखील असल्याने अचानक पाणी वाढल्याने तबेल्यांमध्ये शेकडो म्हशी अडकल्या होत्या.
Mumbai Dam Water Storage: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, सातही धरणे काठोकाठ भरली
advertisement
महानगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरात अडकलेले रहिवासी आणि तबेल्यातील 500 हून अधिक म्हशींचं रेस्क्यू करण्यात आलं. खाडीचं पाणी वस्तीत शिरल्याने अनेक नागरिकांना शाळा, समाजमंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं. मात्र, तबेल्यातील म्हशींना ठेवायचं कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. तबेल्यातून बाहेर काढलेल्या500 हून अधिक म्हशींना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलं.
आज पहाटे (सोमवार) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या म्हशींमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. शेकडो म्हशींमुळे काही काळ वाहनचालकांची गैरसोय झाली. सध्या पावसाने विश्रांती मिळाल्याने खाडी पात्रातील पाणी ओसरत आहे. पाणी ओसरल्याने वस्तीत शिरलेल्या पाण्याचाही निचरा झाला आहे. त्यामुळे तबेला मालकांनी म्हशी पुन्हा तबेल्यात नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होत आहे.