२५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अन्य दोन सहकार्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. बुधवारच्या सुनावणीत पोलीस निरीक्षकाला न पाठवता एसीबी विभागाच्या प्रमुखाला पाठवा, असे निर्देश न्यायाधीशांनी दिले होते. त्यानंतर आजच्या झालेल्या सुनावणीत पुन्हा अधिकाऱ्यांच्या तपासावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शंकर पाटोळेची ५ दिवस पोलिस कोठडी घेऊन काय तपास केला? व्हाटसप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग रिकव्हर का केले नाही? प्रशिक्षण काळात (ट्रेनिंग) तुम्हाला शिकवले नाही का? कॉल कसे रेकॅार्ड केले जातात, याची ट्रेनिंग तुम्हाला दिली नाही का? एवढे पैसे खात्यात जमा होतात मग बँकेने काय कारवाई केली हे तुम्ही तपासले का? बँकेने याबाबत काय पावले उचलली, याची माहिती तुम्हाला नव्हती का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांवर केली.
advertisement
ज्या अधिकाऱ्याला इन्व्हेस्टिगेशन बोलता येत नाही अशा अधिकाऱ्याला तपास देण्यात आलाय. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तपास करायला हवा, अशी टिप्पणी न्यायाधीश एस एस शिंदे यांनी केली.
ठाणे मनपाचे अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिकारी शंकर पाटोळे यांचा जामीन अर्ज ठाणे कोर्टाने फेटाळला. आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन तसेच एसीबीच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आला. शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.