शरद पवार म्हणाले, मोदी असोत किंवा फडणवीस... भाजप नेत्यांकडून बटेंगे तो कटेंगे हे मत मांडलं जातंय. यातून सरळ सरळ धार्मिक उच्छाद मांडला जातोय. बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय? कुणाच्या संदर्भाने तुम्ही अशी विधाने करताय? समाजातल्या एका वर्गाच्या संबंधाने तुम्ही अशी विधाने करताय ना...? मुस्लीम समाज भारताचा हिस्सेदार आहे की नाही? या देशाच्या उभारणीत त्यांचे काही योगदान आहे की नाही? स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता की नव्हता? देशावर संकट आल्यानंतर सबंध देश उभा राहतो, मग देशासोबत ते नव्हते का? असा एखादा धर्म, एखादा वर्ग, एखादा भाषिक हा वेगळा करण्याच्या संबंधीचं चित्र त्याच्यातूनउभे करणे हे देशाच्या ऐक्याच्या दिशेने घातक आहे.
advertisement
भारतीय जनता पक्षाचे लोक जी लाईन घेतायेत मग ते मोदीसाहेब असो किंवा फडणवीस असोत माझ्या मते हे पूर्णत: चुकीचे आहे. विशेषत: नरेंद्र मोदी. कारण मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही एखाद्या पक्षाचे अनुयायी असाल पण ज्यादिवशी तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेता आणि देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारता त्यावेळी तुम्ही कुठल्याही विचारधारेचे राहत नाही, तुम्ही देशाचे असता. तुमची भूमिका ही देशासाठी असली पाहिजे. आज तुम्ही देशाची भूमिका न घेता तुमचा एखादा संकुचित विचार पुढे घेऊन जाता किंवा एखाद्याच राज्याचे हित तुम्ही पाहत असाल तर देशाच्या दृष्टीने हे योग्य नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले. 'बोल भिडू'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
'बटेंगे तो कटेंगे' अशी घोषणा देण्यामागे भाजपची एक विचारपद्धती आहे. मतांचे विभाजन झाल्यास पराभव होतो, असा युक्तिवाद भाजपकडून करण्यात येत आहे. अल्पसंख्याक समाजाचे एकगठ्ठा मतदान होते. त्यामुळे बुहसंख्यांनी मतांचे विभाजन होऊ देऊ नये, असा उतारा योगी आदित्यनाथ यांनी शोधला आहे. योगींचा उत्तर प्रदेशातील फॉर्म्युला महाराष्ट्र भाजपने स्वीकारुन विधानसभा निवडणुकीत त्याचा अवलंब करण्यात येत आहे.
