राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले की, लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हा प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील केली. लक्ष्मण हाके हे सातत्याने शरद पवार यांना टार्गेट करण्याचं काम करत असल्याचा आरोप केला.
advertisement
हाके शाळेच्या चड्डीत फिरायचे तेव्हा...
प्रशांत जगताप यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी म्हटले की, लक्ष्मण हाके ज्यावेळेस चड्डीत शाळा आणि कॉलेजमध्ये फिरायचे, ज्यावेळेस त्यांना मिसरूड देखील फुटलेलं नव्हतं त्या वेळी शरद पवार साहेबांनी या राज्यातल्या ओबीसींना पहिल्यांदा आरक्षण दिले. शरद पवार यांनी लागू केलेल्या आरक्षण धोरणामुळे ओबीसी समाज शिक्षणामध्ये ,नोकरीमध्ये आणि राजकारणात देखील पुढे आला असल्याचे जगताप यांनी म्हटले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्याचेही जगताप यांनी म्हटले.
हाकेंनी समाजासाठी काय केलं?
शरद पवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे ओबीसी समाजाचे मारेकरी आहेत असा विनोदी कार्यक्रम हाके करत आहेत. हाके यांनी आत्मचिंतन करावं अन्यथा ओबीसी समाज आणि इतर समाज हा त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला.
लक्ष्मण हाके सामाजिक कार्यकर्ते आहेत तर त्यांनी समाजासाठी काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी महाराष्ट्र समोर मांडावा असे आव्हानही त्यांनी दिले. लक्ष्मण हाके यांचे आका देवेंद्र फडणवीस आहेत. तुमच्यावर जे हल्ले होत आहेत त्याची चौकशी त्यांना करायला सांगा असे आव्हानही जगताप यांनी दिले. शरद पवार ओबीसींचे जनक आहेत. महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यासाठी अशा वायफळ गोष्टी करणं सोडा असा टोलाही हाके यांना लगावला.