अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसणीचे स्मरण होऊन जनसंघ-भाजपच्या वळचणीला जायचे नाही, असा निर्धार बोलून दाखवत सत्तेविरोधात संघर्ष करण्याची भूमिका स्वीकारली. परंतु सत्तेच्या बाहेर फार दिवस राहू शकत नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची प्रकृती असल्याने झाला एवढा संघर्ष बस्स झाला, आता सत्तेत जायला हवे, असे मत शरदचंद्र पवार पक्षातील एका गटाचे आहे. विरोधात बसणे हा स्वभावगुण राष्ट्रवादीच्या प्रकृतीच्या विरोधात असल्याने १० आमदारांपैकी बहुतांश आमदार हे सत्तेच्या बाजूने जाण्याच्या तयारीत आहेत.
advertisement
दोन्ही राष्ट्रवादीत मनोमिलनाचा सूर कसा जुळला?
गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अनेकदा एकत्र आलेले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठक असो वा रयत शिक्षण संस्थेची वार्षिक बैठक असो, विविध प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा होत आहे. त्यामुळे साहजिक कटुता दूर सारून पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे संकेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मिळाले.
'ते' आमदार अजित पवारांना भेटले
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या १० आमदारांपैकी बहुतांश आमदारांना विरोधात बसण्यात काहीही रस नाही. निधीचे राजकारण आणि मतदारसंघाचा विकास अशी कारणे देऊन सत्तेत गेले पाहिजे, असा दबाव त्यांनी पुन्हा एकदा पक्षावर टाकला आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची भेट घेऊन सरकारमध्ये येण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्यावर दबाव आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
जर अजित पवार यांच्यासोबत गेलो नाही तर दुसऱ्यांदा पक्ष पुन्हा फुटेल, या काळजीने शरद पवार यांनीही सोबत जाण्यासाठी सहमती दर्शवली आहे, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अतिशय वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. पण हे करीत असताना मी निर्णय प्रक्रियेत नसेल, पक्षातील आमदार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे सांगून शरद पवार यांनी 'संभाव्य फुटी'बद्दल बोलणे अत्यंत हुशारीने त्यांच्या नेहमीच्या शैलीनुसार टाळले आहे.
अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याची लवचिकता, शरद पवार यांचे टायमिंग
राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापनदिन येत्या १० जूनला साजरा होणार आहे. त्याआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो, असे सध्या कळते आहे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द अनेक चढ उतारांनी भरलेली आहे. त्यांना अनेकदा आमदार-खासदार सोडून गेले, पक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांना दगा दिला, सर्वोच्च पदाने हुलकावणी दिली, पण असे असले तरी संघर्षाची भूमिका त्यांनी कधी सोडली नाही. परंतु आता बदललेल्या राजकारणाच्या पद्धतीनुसार आणि वयोमानानुसार पुढील पाच वर्षे संघर्ष करून राष्ट्रवादीचे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अस्तित्व ठेवणे हे सोपे नाही, याची जाणीव धूर्त शरद पवार यांना आहे. तसेच सखेसोबतीही सत्तेविरोधात संघर्ष करून राजकीय किंमत चुकविण्याची हिम्मत ठेवत नसल्याने अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याची लवचिकता शरद पवार यांनी वेळ आणि काळानुसार दाखवली आहे, असे म्हटले जाते आहे.