राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल, अशी खात्रीही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांचा वस्तूपाठ डोळ्यांसमोर ठेवून रोहित पवार काम करीत आहेत. नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी रोहित पवार सदैव कार्यरत राहतील, असा आशावाद सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच नव्या जबाबदारीबद्दल रोहित पवार यांचे अभिनंदन केले.
advertisement
पक्षाने रोहित पवारांना 'पॉवर' दिली
रोहित पवार यांच्याकडे सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिल्याने पक्षातील त्यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. सर्व फ्रंटल सेलला रोहित पवार यांना आपल्या कामाचा रिपोर्ट आता द्यावा लागणार आहे. सरचिटणीस आणि फ्रंटल सेल प्रभारी या पदाच्या माध्यमातून नव्या संघटनेत रोहित पवार 'आपली माणसं' आणतील, जेणेकरून पुढील काळात पक्षात आपले वजन कायम राहील. त्यामुळे त्यांच्याकडे वरील पदे देऊन अत्यंत पॉवरफुल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रोहित पवार यांची राजकीय कारकीर्द
रोहित पवार यांनी राजकारणात प्रवेश करण्याआधी बारामती अॅग्रोची जबाबदारी सांभाळली. सहकार समजून घेत असताना त्यांनी देशभ्रमंती केली. देशभरात फिरून त्यांनी सहकार, साखरप्रश्न, साखर उद्योगावरील आधारित व्यवसाय आणि त्यासंबंधी प्रश्न आदींची यशोचित माहिती घेतली. सुरुवातीच्या काळात शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी महाराष्ट्रही व्यवस्थित समजून घेतला. शिर्सुफळ गटातून ते पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. नंतर पवारांच्या चाणाक्ष नजरेतून आणि त्यांच्या सूचनेनुसार दुष्काळी पट्टा समजल्या जाणाऱ्या कर्जतमध्ये विधानसभेची तयारी रोहित पवार यांनी केली. प्रा. राम शिंदे यांना २०१९ आणि २०२४ अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी पराभूत केले.