आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांनीच हा निर्णय घेतल्याचं पवारांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी पक्षांतर्गत बैठक घेऊन हा निर्णय घेतला असावा, असं वक्तव्य पवारांनी केलं. पवारांनी थेट कुणावरही आरोप केला नसला तरी पवार कुटुंबाला चर्चेत न घेता हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
१५ मिनिटांच्या या स्फोटक पत्रकार परिषद शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, पार्थ पवार पर्यायाने सुनेत्रा पवार यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला. कारण ज्यादिवशी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच रात्री बारामतीतील सिटी इन हॉटेलमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने मुंबईला रवाना झाले. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचं सूचित करण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
शिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार होते. विलीनीकरणाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती. अजित पवारा गटाकडून स्वत: अजित पवार वाटाघाटी करत होती. जयंत पाटलांसोबत त्यांची शेवटची बैठक पार पडली होती. बैठकीतील सर्वच नेते सकारात्मक होते. अजित पवारांनी विलीनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या होत्या. विलीनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या होत्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलीनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असं मोठं वक्तव्य देखील शरद पवारांनी केलं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे तटकरे, पटेल, मुंडे आणि पार्थ पवार हे नेते विलीनीकरणास तयार नव्हते, असं सांगण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
