शरद पवार गटाचे स्थानिक पातळीवरचे अनेक नेते पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अडचणीत सापडताना दिसत आहे. समोर अजित पवार यांचं आव्हान असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवारांवर मोठा डाव टाकला आहे. भाजपनं जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा नेता आपल्या गळाला लावला आहे.
advertisement
शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ भाजपात जाणार
पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिलीप वाघ यांनी अलीकडेच जळगाव येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची माहिती स्वत: दिलीप वाघ यांनी दिली आहे. खरं तर, जळगावात अनेक महत्त्वाचे नेते सोडून गेल्याने आधीच शरद पवारांची ताकद कमी झाली आहे. अशात आता दिलीप वाघ हेही भाजपात प्रवेश करणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बॅकफुटला जाताना दिसत आहेत.
विधानसभेत डावलल्याने सोडणार साथ
माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांच्या परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांसोबत राजकीय संबंध आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वास न दाखवल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढावी लागली होती, याच कारणातून दिलीप वाघ पक्ष सोडत असल्याची माहिती आहे. विधानसभेला संधी न मिळाल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची पक्षावर नाराजी होती. त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची आमदार दिलीप वाघ यांनी न्यूज १८ लोकमतला सांगितलं आहे.
शरद पवारांना दुहेरी धक्का?
येत्या काही दिवसांमध्ये मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे. वाघ यांच्या पक्ष प्रवेशाने पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे. दिलीप वाघ यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय वाघ देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दुहेरी धक्का मानला जात आहे.
