अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व आणि नेतृत्वाचा प्रश्न उभा ठाकलेला असताना आणि पक्षातूनही बरेच मतप्रवाह समोर येत असताना शरद पवार यांनी बारामतीत सक्रीय होऊन 'काठावरच्या' नेत्यांना सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार तसे खमके नेते, मनात कितीही दु:ख असेल तरी सार्वजनिक मंचावरून कधीही भावनिक न होणारे. मात्र अजित पवार यांच्या जाण्यानंतर ते आतून तुटल्याची भावना त्यांचे मित्र विठ्ठल शेठ मणियार यांनी व्यक्त केली. मात्र पुतण्याच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून बारामतीने नेतृत्वाबद्दलची काळजी करण्याची गरज नाही, असे आपल्या कृतीतून शरद पवार यांनी दर्शवले असल्याची चर्चा आहे.
advertisement
घराच्या बाहेर पडून पाहणीसाठी थेट नीरा नदीवर
पवार कुटुंबीयांवर आभाळ कोसळले असताना आज बारामतीच्या सोनगाव येथील कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करून तसेच दुःख विसरून शरद पवार कामाला लागले. बारामतीच्या निरावागज येथे नीरा नदी प्रदूषणासंदर्भात आलेल्या तक्रारी संदर्भात स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली. प्रदूषित पाणी हातात घेऊन त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
गेली काही महिने सार्वजनिक मंचावरून दूर पण दादांच्या जाण्यानंतर तिसऱ्याच दिवशी सक्रिय
शरद पवार गेली काही महिने सार्वजनिक मंचावर फारसे दिसले नाही. त्यांच्या तब्येतीवर फार परिणाम झाल्याचे जाणवते. त्यांचा आवाजही क्षीण झाला आहे. मध्यंतरी त्यांची प्रकृतीही बरी नव्हती. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या जाण्याने त्यांच्यावर मानसिक आघात झाला, असे असूनही त्यांनी आज निरावागज येथील नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या आश्वासक कृतीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा मीच! शरद पवारांनी कृतीतून दाखवलं
शरद पवार यांचे न ऐकता अजित पवार यांनी बंड करून भाजपशी घरोबा केला. त्यानंतर पक्षात शरद पवार एकटे पडले. जवळचे सगळे साथीदार त्यांना सोडून गेले. त्यावेळी राष्ट्रवादीचे कसे होणार, पक्षाचे भवितव्य काय असणार? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. पत्रकारांनी याच अनुषंगाने प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादीचा आश्वासक युवा चेहरा मीच, असे शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने सांगितले. आता अजित पवार यांच्या जाण्यानंतरही पक्षाचे काम करणे मी अजून थांबवले नाही, असा संदेश शरद पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.
