शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी "बाप एकच ठेवायचा असतो, बाप बदलायचा नसतो" अशा शब्दांत भाजप नेते आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे. खालच्या भाषेत टीका केल्याने धाराशिवमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदे यांनी नुकताच धाराशिव दौरा केला. या दौऱ्यात शरद पवार गटाच्या एका उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना शशिकांत शिंदे यांनी ही टीका केली.
advertisement
राणा जगजीतसिंह पाटील यांना उद्देशून शशिकांत शिंदे म्हणाले की, "काही लोक म्हणतात की शरद पवार यांनी काय दिलं? जर शरद पवारांनी काही दिलं नसतं तर तुम्ही मंत्री झाला नसता. तुम्ही संत्री झाला नसतात. जर शरद पवार नसते तर तुमची राजकारणात ओळख झाली नसती. शरद पवार यांच्यामुळेच तुमची राजकारणात ओळख झाली. बाप एकच ठेवायचा असतो. बाप बदलायचा नसतो. आम्ही फुटलो नाही. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही निष्ठावान आहोत."
शशिकांत शिंदे यांच्या टीकेनंतर आता धाराशिवमधील राजकीय वातावरण तापलं असून आता शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात वाद पेटण्याची चिन्हं आहेत. आधीच धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर विरुद्ध राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात राजकीय धुसफूस सुरू आहे. अशात शशिकांत शिंदेंनी खालच्या शब्दात टीका केल्याने येत्या काळात धाराशिवमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
