पुणे : जमीन आणि संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताची नाती किती खालच्या थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे आला आहे. एका कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादातून सावत्र मुलाने आपल्याच वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अमानुष कृत्यात मुलासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. वृद्ध महिला हक्काच्या जमिनीसाठी मागणी करत असताना सावत्र मुलाला ते मान्य नव्हते. मंगळवारी या वादाने रौद्र रूप धारण केले. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले आणि संतापाच्या भरात सावत्र मुलाने आणि त्याच्या घरातील सदस्यांनी वृद्ध आईवर हल्ला केला.
कपाळावर सुरकुत्या पडलेल्या आणि चालण्या-बोलण्याचे त्राण नसलेल्या या वृद्ध महिलेला नराधम मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिलेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ किंवा माहिती समोर येताच गावकरीही हादरून गेले आहेत.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध माता-पित्यांचे संरक्षण करणे हे मुलांचे कर्तव्य असताना केवळ जमिनीसाठी असा हल्ला करणे निंदनीय आहे, अशा प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञांकडून उमटत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.
बीडमध्ये देखील घडला होता असाच प्रकार
काही दिवसापूर्वी एकुलत्या एक मुलाने संपत्तीसाठी ट्रॅक्टर आणि जमीन नावावर करून दे म्हणत स्वतःच्या वडिलांसह वाद मिटवण्यासाठी आलेल्या बहीण आणि मेहुण्याला देखील मारहाण केली बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात ही घटना घडली. इथं मुलानेच सासरच्या लोकांना सोबत घेऊन वडिलांसह बहीण आणि मेहुण्याला डोळ्यात चटणी टाकून लोखंडी पाईप आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. यामध्ये सुभाष ठोंबरे हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मुलाकडूनच बापाला अशाप्रकारे अमानुष झालेल्या मारहाणीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
