ठाणे महानगरपालिकेत खूप मोठा भ्रष्टाचार झालाय. अधिकारी कोणाच्या इशाऱ्यान काम करतायेत, हे लपून राहिलेले नाही. अधिकाऱ्यांना कोणाचीच भीती नाही, कारण त्यांना एक विशिष्ट शक्ती पाठबळ देत आहे. २०१७ साली निवडणूक झाली आणि आता गेली साडे तीन वर्षे ठाणे मनपावर प्रशासक काम पाहत आहेत अशातच ठाण्यातील रस्ते, मुलभूत सुविधा यांचा बोजवारा उडाला असून त्या विरोधात मनसे आणि शिवसेना एकत्रित येवून आवाज उठवणार असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव आणि माजी खासदार राजन विचारे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
advertisement
ठाणे महानगरपालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे आणि अपूर्ण कामामुळे ठाण्यातील जनता त्रस्त आहे, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. विरोधी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत. कशा रितीने ठाणे मनपाचा कारभार सुरू आहे, पालिकेची तिजोरी कशी लुटून खाल्ली जात आहे, हे सर्व विषय घेऊन एकत्रित मोर्चा काढला जाणार आहे. यात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष सामील होणार असल्याचेही या वेळेस स्पष्ट करण्यात आले.
मेट्रोचे काम अर्धवट असून देखील उद्घाटन केले गेले, असा गंभीर आरोप करत सोमवारी १३ ऑक्टोबर या दिवशी शिवसेना आणि मनसे मिळून धडक मोर्चा काढणार आहोत, असे माजी खासदार राजन विचारे यांनी जाहीर केले.