उद्घाटनच्या कार्यक्रमाला गेलेले असताना अमोल खताळ यांच्यावर हल्ला
आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले होते. खांडगाव येथील एकाने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे.
खताळ समर्थकांचा समूह पोलीस ठाण्यात जमा व्हायला सुरुवात
अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याची बातमी संगमनेरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर खताळ समर्थक प्रचंड आक्रमक झाले असून आमदार समर्थकांचा प्रचंड मोठा समूह संगमनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाला आहे.
advertisement
संगमनेरचे वातावरण पुन्हा तापले
आमदार खातळ यांच्यावरील हल्ल्याची वार्ता समजताच शेकडो तरुणांची मालपाणी लॉन्स बाहेर गर्दी झाली. हल्ल्याच्या घटनेमुळे ऐन गणेशोत्सवात संगमनेरमधील राजकारण तापले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्ष, संगमनेरची राज्यात चर्चा
संगमनेरचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांच्या समर्थकांमध्ये विविध कारणावरून कलगीतुरा रंगत आहे. विधानसभा निवडणूक निकालापासून या ना त्या कारणाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने येत आहेत. हिंदुत्ववादी खताळ विरुद्ध धर्मनिरपेक्ष थोरात असे चित्र संगमनेरमध्ये आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत आक्रमक होऊन एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
कोण आहे अमोल खताळ?
-अमोल खताळ हे संगमनेरचे शिवसेना शिंदेसेनेचे आमदार आहेत
-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला
-अमोल खताळ हे प्रखर हिंदुत्त्ववादी नेते म्हणून ओळखले जातात
-भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ताकद अमोल खताळ यांच्या मागे आहे
-अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष तीव्र