पालघर : एकनाथ शिंदेंसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तिकीट देण्यात आलं, फक्त एकाच आमदाराचं तिकीट कापण्यात आलं. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली नाही. श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित हे आधी भाजपमध्ये होते, पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
advertisement
शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले. एकनाथ शिंदेंसोबत एकनिष्ठ राहिलो ही माझी चूक झाली का? असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे हेच फक्त शब्दाचे पक्के आहेत, त्यांच्यासोबत केलेल्या गद्दारीची शिक्षा मी भोगतोय, असं म्हणत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले. मागच्या दोन दिवसांपासून श्रीनिवास वनगा घरात न जेवता रडत बसले आहेत, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.
वनगा हे कालपासून डिप्रेशनमध्ये असून त्यांच्या मनात जीव द्यायचे विचार येत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नींनी केला आहे. 'एकनाथ शिंदेंनी आम्हाला फसवलं आहे, उद्धव ठाकरेंसारख्या देव माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदेंसोबत गेले ही त्यांची घोडचूक आहे', असं श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी म्हणाल्या आहेत.
माझ्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण सांगून बंड करणारे आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले, पण माझ्या नवऱ्याला का फसवलं? 40 पैकी 39 आमदारांना तिकीट देता, मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला? असा प्रश्न श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने एकनाथ शिंदेंना विचारला. श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनाही अश्रू अनावर झाले.
