एकनाथ शिंदे यांच्याकडून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार उतरवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यासाठी पक्षाकडून अनेक नावांची चाचवणी करण्यात आली. भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण त्यांच्या ऐवजी मिलिंद देवरा यांचे नाव आता समोर येत आहे.
वरळीत मराठी मतदार, मच्छिमार आणि उच्चभ्रू लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वरळीत मनसेकडून गेल्यावेळी कोणताही उमेदवार दिला गेला नव्हता. पण यावेळी मनसेने संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलंय. त्यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळेल असं म्हटलं जात होतं. पण शिंदेंनी आदित्य ठाकरेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार उतरवण्याचा चंग बांधला आहे. यामुळे वरळीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
advertisement
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वरळी विधानसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे हे २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले. त्यांनी ६७ हजार मतांनी निवडणूक जिंकली. २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश माने यांचा पराभव केला होता. आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाला वरळीत ६७०० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच मिलिंद देवरा मैदानात उतरल्यास आदित्य ठाकरेंना निवडणूक जिंकणं कठीण जाऊ शकतं.
