शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता, अशा काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून काम केलं होतं.
advertisement
निवडणुकीच्या निकालानंतर दुर्दैवी घटना
मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पराभव झाल्याचं समोर आल्यानंतर ठाकरेंच्या पक्षात शांतता पसरली होती. निकाल लागल्यानंतर काही वेळातच नीला देसाई यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे ठाकरे गटाला दुहेरी झटका बसला आहे.
नीला देसाई यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
