मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयाविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष कोर्टात धाव घेणार आहे. एकीकडे मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल वादात सापडला असतानाच आता ठाकरेंच्या पक्षाने नारायण राणेंच्या विजयावरही आक्षेप घेतला आहे. नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊत यांनी ऍड असीम सरोदे यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.
advertisement
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत असा सामना झाला. या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांचा 47,858 मतांनी विजय झाला. नारायण राणे यांना 4,48,514 मतं मिळाली तर विनायक राऊत यांना 4,00,656 मतं घेता आली.
विनायक राऊत यांच्या नोटीसमध्ये काय?
आचारसंहिता लागू झाली तेव्हा उमेदवार जाहीर नव्हता, त्यावेळी लीड मिळाला नाही तर पाहून घेईन, अशी धमकी नितेश राणे यांनी सरपंचांना दिली, असा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. तसंच मतदाराला मत देण्यासाठी 5 हजार रुपये वाटले. प्रचार संपल्यानंतरही प्रचार करायला सांगितलं, असे आरोपही विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आले आहेत.
ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचा तर रायगडमध्ये सुनिल तटकरे यांचा विजय झाला. उद्धव ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत आणि अनंत गीते यांना पराभवाचा धक्का लागला.