सांगलीची स्मृती मानधना इंदूरची सूनबाई होणार आहे. आज २३ नोव्हेंबरला सांगलीतच तिचा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. संगीतकार, निर्माता पलाश मुच्छलसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्मृतीची हळद, संगीत अशा कार्यक्रमांच्या चित्रफिती समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहेत. लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच तिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने काहीसे चिंतेचे वातावरण लग्न घरात आहेत.
advertisement
श्रीनिवास मानधना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल
श्रीनिवास मानधना यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी उपचार करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते आहे. मात्र स्मृतीच्या लग्न वेळेत बदल होण्याची दाट शक्यता निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे.
स्मृतीच्या लग्नसोहळ्यासाठी पाहुण्यांची वर्दळ
स्मृतीच्या लग्नसोहळ्यासाठी भारतीय संघातील महिला खेळाडूंनी गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत हजेरी लावली आहे. तसेच स्मृतीचे नातलग, मित्र मैत्रिणी तसेच आप्तेष्टांनी देखील सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. गेल्या आठवडाभरापासून स्मृतीच्या लग्नाची तिच्या सांगलीतील फार्महाऊसवर जय्यत तयारी सुरू आहे.
