शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेस मागील अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरू आहे. नागपूर ते रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी अनेक चांगले रस्ते आहेत. मग शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी इंग्रजी भाषेतून सरकारला फटकारले.
बार्शी तालुक्यातील शेलगाव आर येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत शक्तिपीठाला तीव्र विरोध दर्शवला. शेतकरी भास्कर एकनाथ पाटील यांची तीन एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात भूसंपादन होणार असल्यामुळे त्यांनी महामार्गाला विरोध करीत आपल्या व्यथा मांडल्या. तसेच शक्तिपीठ मार्गाच्या इंग्रजी शासन अध्यादेशाला शेतकऱ्यांनी इंग्रजीमधूनच उत्तर दिले आहे.
advertisement
गांधी टोपी घातलेल्या शेतकऱ्याने इंग्रजीतून सरकारला खडसावले
Quotation are not invited, road should be cancel असे म्हणत भास्कर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन इंग्रजी भाषेतून सरकारला खडसावले. भास्कर पाटील यांनी शेतीचं महत्व पटवून देताना अंतःकरणापासून सात पिढ्यापासून कसलेली जमीन शासन आपल्याकडून हिसकावून घेत असल्याचे म्हणाले.
आमच्या सात पिढ्यांनी काळ्या आईची सेवा केली, जमीन गेली तर आम्ही जगायचे कसं?
मागणीशिवाय पुरवठा करता येत नाही. मग कुणाचीही मागणी नसताना शासनाने शक्तिपीठ रस्त्याचा घाट का घातला आहे. कंत्राटदारांसाठी हा महामार्ग होतोय का? असा सगळ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. अनावश्यक महामार्ग करू नका. काळी आई आमची माता आहे. आमच्या कित्येक पिढ्यांनी काळ्या आईची सेवा केलीये. आम्हाला आमची आई प्रिय आहे. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी ही शेती ठेवली, तीच गेली तर आम्ही जगायचे कसे? अशा प्रश्नांच्या फैरी बाधित शेतकरी भास्कर पाटील यांनी सरकारवर झाडल्या.