शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका हुशार विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून चौकशी सुरू आहे.
साक्षी सुरेश मैलापुरे (वय अंदाजे २२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जुळे सोलापूर येथील आपल्या राहत्या घरी स्कार्फच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. साक्षी ही सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.
advertisement
साक्षी अभ्यासात अत्यंत हुशार होती. एमबीबीएसच्या पहिल्या दोन वर्षांत तिने चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण केली होती. तिच्या वडिलांचे नाव सुरेश मैलापूर असून, ते वीज वितरण कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर्व काही व्यवस्थित असतानाही साक्षीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल तिच्या कुटुंबीयांना आणि महाविद्यालयातील मित्रांनाही धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या विजापूर नाका पोलीस आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा कसून शोध घेत आहेत. साक्षीने आत्महत्या करण्यापूर्वी कोणती चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.