सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे सोलापूरात रात्री अपरात्री घराबाहेर पडत असाल, तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण फिरत असल्याचं पोलिसांना आढळलं तर कठोर कारवाई होणार आहे. ही कारवाई करण्यासाठी आता सोलापूरच्या पोलीस आयुक्तांसह, उपायुक्त आणि ठाणेदार दोन तास पायी पेट्रोलिंग मोहीम राबवणार आहेत.
advertisement
सोलापूर शहरातील विविध भागात हे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. यामुळे रात्री अपरात्री नाईट आऊटसाठी बाहेर पडणाऱ्या तरुणाईला आणि उशिरापर्यंत पार्टी करणाऱ्यांना धक्का बसणार आहे.
खरं तर, गेल्या काही काळापासून सोलापूरात गुन्हेगारीच्या विविध घटना वाढत आहे. या घटना प्रामुख्याने रात्री अंधाराचा फायदा घेऊन केल्या जात आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. यानिमित्ताने रात्री सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांना देखील चाप बसणार आहे.