डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम वकीलसुद्धा होते. खटल्यातील सत्य न्यायालयासमोर मांडून अनेक गरजू लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि त्यांचे प्राणही वाचवले आहेत. एका खून प्रकरणी इंग्रजांनी सोलापूरच्या शिवाप्पा पाटील यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण बाबासाहेबांनी न्यायालयात लढून शिवाप्पा पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे पाटील घराण्यात आजही बाबासाहेबांना पूजले जाते.
advertisement
शिवानंद पाटील यांचे आजोबा स्वर्गीय शिवप्पा पाटील हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावातील पाटीलकी सांभाळायचे. ही घटना 1936 ची आहे, पाटील यांच्या शेतात एक मृतदेह सापडला आणि त्याच कारणावरून पोलिसांनी चौकशी न करता त्यांना अटक करून तुरुंगामध्ये जेरबंद केले होते. याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने शिवप्पा पाटील यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. एकुलत्या एक मुलाला फाशीची शिक्षा झाल्याने त्यांचे वडील पुंडलिक पाटील यांचा आधार तुटला होता.
पुंडलिक पाटील यांनी पनवेल येथे बाबासाहेबांकडे जाऊन खटला लढवण्यासाठी विनंती केली. पण पुंडलिक पाटील यांना कन्नड भाषेशिवाय अन्य भाषा येत नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी सोलापुरातील अण्णासाहेब एदाळे यांना बोलावून घेतले आणि खटल्यास संबंधित सर्व माहिती ऐकून घेतली. तेव्हा बाबासाहेबांनी हा खटला विनाशुल्क लढवण्याची तयारी दर्शवली.
सत्र न्यायाधीश हे युरोपियन असल्याने त्यांना आरोपीची भाषा कळत नव्हती त्यामुळे हा खटला विजापूर येथील सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी केली. ती मागणी मान्य झाली आणि बाबासाहेब 24 एप्रिल 1937 साली वळसंग येथे आले तेथील कार्यक्रम आटोपून रेल्वेने विजापूरला गेले आणि न्यायालयात युक्तिवाद करून शिवप्पा पाटील यांची खून प्रकरणातून निर्दोष सुटका केली.
सोलापूर व विजापूर जिल्ह्यातील लोकांना या खटल्याची उत्सुकता होती. बाबासाहेबांना पाहण्यासाठी आणि त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी विजापूरच्या न्यायालय परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. आजही पाटील कुटुंब देवदेवतांच्या पूजेच्या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. बाबासाहेबांचे ऋण पाटील कुटुंबीय उतराई करू शकणार नसल्याची भावना शिवानंद पाटील यांनी व्यक्त केली.





