दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार दिल्याने काँग्रेसच्या दिलीप माने समर्थकांनी जोरदार राडा घातला होता. त्यानंतर अखेर काँग्रेसने आज जाहीर केलेल्या यादीत दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिणची जागा कोण लढविणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये दक्षिण सोलापूरवरून वादाची ठिणगी
पडली आहे.
advertisement
महाविकास आघाडीतील जागावाटपात सोलापूर दक्षिणची जागा शिवसेना ठाकरे गटाने आग्रह करून मिळवली तसेच पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेच्या या कृतीमुळे काँग्रेसकडून इच्छुक असणारे दिलीप माने कमालीचे नाराज झाले. त्यांच्या समर्थकांनी धुडघूस घालत शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस पक्षाला दक्षिण सोलापूरची जागा सोडावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे मनधरणी केली.अखेर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे.
परंतु आघाडीतील दोन पक्षांनी एकाच जागांवर उमेदवारी दिल्याने नेमका कोणता पक्ष एक पाऊल मागे घेणार आणि कोणता पक्षन सोलापूर दक्षिणमध्ये लढणार, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागावाटपातील धोरणावर राहुल गांधी नाराज असल्याचे कळते. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जागावाटपात कमी पडले, अशी खंत त्यांनी व्यक्त केल्याचे कळते.
काँग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवार
1.अमळनेर - अनिल शिंदे
2.अमरेड - संजय मेश्राम
3.आरमोरी - रामदास मश्राम
4.चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर - संतोषसिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण-दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके
