सोलापूर जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. तर 7 सप्टेंबर 2025 रोजी मुस्लिम बांधवांकडून मोहम्मद पैगंबर जयंती अर्थातच ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजेच दहा दिवस गणेश उत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गणरायाचे विसर्जन करत असताना मिरवणुकीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून साऊंड सिस्टम सोबत प्लाझमा, बीम लाईट तसेच लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
advertisement
वाजवा रे वाजवा! रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला अधिकृत परवानगी जाहीर
प्लाझमा, बीम लाईट आणि लेझरमुळे वाहन चालकाचे डोळे दिपून चालकांचे नियंत्रण सुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तर दुसरीकडे मिरवणूक पाहण्यासाठी आलेली लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यास इजा होऊन डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी लेझर लाईटवर निर्बंध घातले असून त्याच्या वापर करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. या उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्ये आणि सजावटीसोबत डीजे, डॉल्बी, लेझर आणि बीम लाइटचा देखील काही मंडळांकडून वापर होतो. मात्र, यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे सोलापूर शहराच्या हद्दीत लेझर आणि इतर हानीकारक लाईटचा वापर करता येणार नाही, असा आदेश पोलिसांनी दिला असून 27 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे.






