मयत गोविंद हा पूजा गायकवाडच्या प्रेमात पार बुडाला होता. दोघं अनेकदा कलाकेंद्रा व्यतिरिक्त अनेक ठिकाणी एकमेकांना भेटायचे. बीडसह वैराग परिसरातील विविध लॉजवर देखील ते सोबत राहिले आहेत. याशिवाय ते कधी घरी किंवा फ्लॅटवर भेटत असल्याची देखील माहिती आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडच्या केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. आपण गोविंदसोबत प्रेमसंबंधात होतो, अशी कबुलीही पूजाने दिली आहे.
advertisement
याशिवाय, पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गेच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबींचा छडा लावला आहे. तसेच, पूजा गायकवाडसोबत काम करणाऱ्या काही सहकारी आणि मैत्रिणींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
पूजा गायकवाडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी, या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे पोलिसांचे हक्क कायम आहेत. पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंवर अधिक तपास करत आहेत. गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडला व्हॉट्सअॅप मेसेज केले होते. ज्यात त्याने आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. दरम्यान, पूजाने संपर्क तोडल्यामुळे नैराश्यात गेल्याने गोविंदने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.