सोलापूर – हिंदू-मुस्लिम या दोन धर्मांच्या नावाखाली आतापर्यंत अनेकदा राजकारण झालं. या दोन्ही समाजात अजूनही दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. पण या सगळ्याला अपवाद ठरणारी हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे अशीच एक घटना घडलीये. बेवारस अवस्थेत सापडलेल्या 75 वर्षाच्या वृद्धावर मुस्लिम बांधवांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय.
advertisement
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारातील बोदलप्पा मदगौंडा दिवटे यांच्या शेतात 29 मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता. सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पीएसआय संदीप काशीद यांना पाठवून पंचनामा केला. तेव्हा हा वृद्ध मृत अवस्थेत आढळला. त्याची अंगातील शर्ट व धोतर याची झडती घेतली. मात्र ओळख पटवणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता. त्यामुळे याची मंद्रूप पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली.
Solapur: जिथे नवऱ्याने जीव सोडला, तिथेच बायकोनेही आयुष्य संपवलं, दोन्ही चिमुरडी अनाथ
मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात मृतदेह ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सदर मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शोध घेवूनही त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे आज पाचव्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
मुस्लिम तरुणांचा पुढाकार
मृतदेहाची ओळख पटली नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, पोलीस शिपाई संदीप काळे, विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला. मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाफ, आसिफ शेख, सैफन नदाफ, आरिफ नदाफ यांनी तिरडी बांधली. त्यांना अनिल टेळे, सिद्धाराम कुंभार, मल्लिकार्जुन जोडमोटे,अमोगसिध्द लांडगे, बबलू शेख, शिवराज मुगळे यांनी मदत केली.
हिंदू पद्धतीने केला संपूर्ण अंत्यविधी
मृतदेहावर मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले. धर्म माणसांना एकमेकांपासून दूर ठेवतो. पण धर्माआधीही माणूसकीचा धर्म सगळ्यात मोठा आहे. म्हणूनच आम्ही कोणताही दुजाभाव न करता एकोप्याने राहतो, असे येथील गावकरी अभिमानाने सांगतात.