Solapur Crime : बार्शीतील मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पैंजणावरून पोलिसांना पटली ओळख, प्रियकर अन् सासूचा धक्कादायक कारनामा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Barshi Crime : अश्विनीने 16 जुलै 2025 रोजी पुण्यातील शिक्रापूर येथून अभिषेक बांगर याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच प्रियकर पलटला.
Solapur Barshi Crime News : बार्शी तालुक्यातील तुर्कपिपंरी परिसरातील एका शेतात काही दिवसांपूर्वी एक अत्यंत विदारक अवस्थेतील मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, कारण प्राण्यांनी तो मृतदेह छिन्नविच्छिन्न केला होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे हा मृतदेह एका या 17 वर्षीय तरुणीचा असल्याचे निष्पन्न केले आहे. ही तरुणी मूळची परभणीची असून ती बीड जिल्ह्यात वास्तव्यास होती.
पळून जाऊन प्रेमविवाह केला
पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली असून, ही आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे. अश्विनीने 16 जुलै 2025 रोजी पुण्यातील शिक्रापूर येथून अभिषेक बांगर याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या सुखाचा संसार दुःखात बदलला. प्रियकर आणि त्याच्या आईने अश्विनीला कामाच्या कारणावरून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.
advertisement
स्वयंपाक येत नाही आणि कामं जमत नाही
हा छिन्नविच्छिन्न मृतदेह 29 जानेवारी 2026 रोजी एका शेतात आढळून आला होता. मृतदेहाचे डोके धडावेगळे झाले होते, मात्र तेथे सापडलेले कपडे आणि पायातील पैजण यावरून अश्विनीच्या वडिलांनी तिची ओळख पटवली. अश्विनी आणि अभिषेक हे माढा तालुक्यातील केवड येथील बबनदादा शिंदे साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी आले होते. तेथे तिला स्वयंपाक येत नाही आणि कामं जमत नाही, असं म्हणून सासरच्या मंडळींनी तिचं जगणं असह्य केलं होतं.
advertisement
मृतदेह बैलगाडीत टाकला
या जाचाला कंटाळून अश्विनीने 13 जानेवारी 2026 च्या रात्री ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवली. आपली चूक लपवण्यासाठी अभिषेक आणि त्याच्या आईने अत्यंत निर्दयीपणे अश्विनीचा मृतदेह बैलगाडीत टाकला आणि तुर्कपिपंरी शिवारात खड्डा खोदून तो पुरला. त्यांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही दिवसांनी कुत्र्यांनी आणि इतर प्राण्यांनी तो खड्डा उकरल्यामुळे हे सर्व भयानक सत्य लोकांसमोर आले.
advertisement
आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी
दरम्यान, या प्रकरणी अश्विनीचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी तालुका पोलिसांनी अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पळून जाऊन विवाह केल्यानंतर ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्यानेच अश्विनीचा विश्वासघात केला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 11:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : बार्शीतील मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पैंजणावरून पोलिसांना पटली ओळख, प्रियकर अन् सासूचा धक्कादायक कारनामा!










